नोकरभरतीसाठी ‘महाजॉब्स’ बंधनकारक



उद्योगक्षेत्रात रोजगार मिळवण्यासाठी उत्सुक उमेदवारांनी व नोकरी देणाऱ्या कं पन्यांनी महाजॉब्स संकेतस्थळाला दिलेला महाप्रतिसाद उत्साहवर्धक आहे. राज्य सरकारने नुकतेच विविध देशांतील कंपन्यांसोबत सामंजस्य करार केले आहेत. या कंपन्यांमध्ये नोकरभरती करताना महाजॉब्समध्ये नोंदणी करणे बंधनकारक असेल, असे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी जाहीर केले. महाजॉब्सवरून ७५० जणांना आता भरती प्रक्रियेसाठी बोलावणेही आले आहे.



राज्य सरकारने दोन दिवसांपूर्वी सुरू केलेल्या महाजॉब्स संकेतस्थळाला राज्यातील नोकरी इच्छुक तरुणांनी महाप्रतिसाद दर्शविला आहे. त्यामुळे आमची जबाबदारी वाढली आहे.

यावर संनियंत्रण ठेवण्यासाठी एमआयडीसीला स्वतंत्र कक्ष स्थापन करण्याच्या सूचना केल्या आहेत. नोंदणी करणाऱ्या इच्छुकांना नोकरी मिळेपर्यंत पाठपुरावा केला जाईल. सध्या कार्यरत असलेल्या कंपन्यांमध्ये उपलब्ध रोजगार या संके तस्थळावरून मिळतीलच. पण त्याचबरोबर महाराष्ट्रात नव्याने गुंतवणूक करणाऱ्या कंपन्यांना आपल्या नोकरभरती प्रक्रि येत महाजॉब्सचा वापर करणे बंधनकारक असेल. राज्य सरकारने नुकतेच काही सामंजस्य करार केले. त्यांनाही नोकरभरतीसाठी महाजॉब्सचा वापर करावा लागेल. त्यामुळे भूमिुपत्रांना रोजगार मिळण्यासाठी या संकेतस्थळाचा चांगला उपयोग होईल, असा विश्वास सुभाष देसाई यांनी व्यक्त केला.

१ लाख २६, ९६१ जणांची नोंदणी


  • महाजॉब्सवर रोजगारासाठी नोंदणी करणाऱ्यांची संख्या एक लाख २६ हजार ९६१ वर पोहोचली आहे. तर १०४२ कंपन्यांनी नोंदणी केली आहे. त्यापैकी १८ कंपन्यांनी बुधवारी १२०६ पदांच्या भरतीसाठी प्रक्रिया सुरू केली.
  • टाळेबंदीमुळे लाखो परप्रांतीय कामगार गावी गेले. राज्यात कामगारांच्या तुटवडय़ामुळे अनेक कारखाने सुरू होऊ शकलेले नाहीत, तर अनेकांना अपुऱ्या मनुष्यबळावर काम भागवावे लागत आहे. दुसरीकडे, मंदीमुळे अनेक बेरोजगार नोकरीच्या शोधात आहेत. त्यामुळे उद्योगांची कामगारांची गरज आणि बेरोजगारांना कामाची संधी देण्यासाठी मध्यस्थ म्हणून उद्योग विभागाच्या ‘महाजॉब्स’ या संकेतस्थळाचे सोमवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण झाले.
  • राज्यातील इच्छुक उमेदवारांनी पहिल्याच दिवशी ‘महाजॉब्स’ला मोठा प्रतिसाद दिला. मंगळवारी ८८,४७३ उमेदवारांनी नोकरीसाठी नोंदणी केली. तसेच मनुष्यबळाच्या शोधात असलेल्या ७५१ कंपन्यांनी कर्मचाऱ्यांची मागणी नोंदवली. टाळेबंदीच्या काळात बेरोजगारीत वाढ झाल्याचे उमेदवारांच्या नोंदणीतून स्पष्ट होत असले तरी रोजगार उपलब्ध असल्याचेही कंपन्यांनी केलेल्या नोंदणीतून दिसून येते.
  • ‘महाजॉब्स’ प्रणालीच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवण्यासाठी व योजनेच्या प्रभावी संचालनासाठी ‘एमआयडीसी’ने एक कक्ष तयार करावा, असे निर्देश उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिले आहेत. राज्याचे अधिवास प्रमाणपत्र असलेल्यांनाच या संके तस्थळाच्या माध्यमातून रोजगार मिळवून दिले जाणार असल्याचे देसाई यांनी स्पष्ट केले आहे.
  • उद्योग विभागाने केलेल्या पाहणीत राज्यातील उद्योगांमध्ये ५० हजार रोजगार तातडीने उपलब्ध आहेत. त्यामुळे या संकेतस्थळाच्या माध्यमातून नोकरी मागणारे आणि देणारे यांच्यात समन्वय साधण्याचा प्रयत्न शासनाकडून करण्यात येत आहे. ‘महाजॉब्स’ पोर्टलद्वारे अभियांत्रिकी, लॉजिस्टिक, रसायने आदी १७ क्षेत्रांची निवड करण्यात आली आहे.