MPSC साठीही आता ‘EWS’चा पर्याय – जाणून घ्या!
Reservation in SEBC for maratha candidates in MPSC exams too
Reservation in SEBC for maratha
candidates in MPSC exams too : राज्यात मराठा आरक्षणाला अंतिरम स्थगिती मिळाल्यानंतर, आता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (MPSC) घेण्यात येणाऱ्या पदभरती परीक्षांमध्ये ‘SEBC’ प्रवर्गातील उमेदवारांना खुला किंवा ईडब्ल्यूएस पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यानुसार उमेदवारांना १५ जानेवारीपर्यंत ‘एमपीएससी’च्या ऑनलाइन प्रणालीद्वारे पर्यायात बदल करायचा आहे, अशी माहिती ‘एमपीएससी’कडून प्रकाशित करण्यात आली आहे.
महाराष्ट्र राज्यातील ‘एसईबीसी’ प्रवर्गासाठी (राज्यातील शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशाकरीता जागांचे आणि राज्याच्या नियंत्रणाखालील लोकसेवांमधील नियुक्त्यांचे आणि पदांचे) आरक्षण अधिनियम, २०१८ नुसार आरक्षण देण्यात आले आहे. या आरक्षणाच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने सरकारकडून वेळोवेळी नमूद केलेल्या कार्यपद्धतीच्या आधारे संबंधित विभागांच्या मागणीनुसार ‘एमपीएससी’मार्फत प्रसिद्ध करण्यात आलेल्या विविध परीक्षांच्या जाहिरातींमध्ये ‘एसईबीसी’ प्रवर्गासाठी पदे आरक्षित दर्शविण्यात आली आहेत.
सर्वोच्च न्यायालयाच्या
आदेशानंतर राज्य सरकारने ‘एसईबीसी’ प्रवर्गातील उमेदवारांना सरळसेवा भरतीसाठी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या आरक्षणाचे लाभ देण्यात येणार आहेत. त्यानुसार ‘एसईबीसी’ प्रवर्गातील उमेदवारांकडून अराखीव (खुला) किंवा ‘ईडब्ल्यूएस’ आरक्षणाचा लाभ घेण्याबाबतचा पर्याय ‘एमपीएससी’ने उपलब्ध करून दिला आहे.
या परीक्षांसाठी पर्याय
- – सहायक मोटार वाहन निरीक्षक पूर्व परीक्षा २०२०
- – राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२०
- – महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित, गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा २०२०
- – महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा २०२०
आरक्षणाचा लाभ मिळवण्यासाठी ‘हे’ करा –
- – आयोगाच्या ऑनलाइन अर्ज प्रणालीमधील उमेदवारांच्या प्रोफाइलद्वारे १५ जानेवारीपर्यंत संबंधित परीक्षेसाठी अर्जाद्वारे खुला किंवा ‘ईडब्ल्यूएस’ यापैकी कोणत्या आरक्षणातून लाभ घ्यायचा आहे, याचा विकल्प देणे आवश्यक.
- – खुला किंवा ‘ईडब्ल्यूएस’चा दावा विहित कालावधीत सादर न करणाऱ्या उमेदवारांचा फक्त अराखीव (खुला) पदावरील निवडीकरीता विचार करण्यात येईल.
- – ‘ईडब्ल्यूएस’चा लाभ घेतल्यास संबंधित उमेदवार ‘एसईबीसी’ आरक्षणासाठी पात्र ठरणार नाही.
- – आयोगाच्या ऑनलाइन अर्ज प्रणालीद्वारे पर्य़ाय सादर न केलेल्या उमेदवारांच्या बाबतीत दाव्यातील बदलाबाबतची विनंती नंतरच्या टप्प्यावर कोणत्याही परिस्थितीत मान्य केली जाणार नाही.