दहावी व बारावीच्या पुरवणी परीक्षा ऑक्टोबरमध्ये घेण्याची मंडळाची तयारी


राज्यात पदवीच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा तसेच एमएचटी-सीईटी बाबत गोंधळाची स्थिती असताना महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च शिक्षण

राज्यात पदवीच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा तसेच एमएचटी-सीईटीबाबत गोंधळाची स्थिती असताना महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च शिक्षण मंडळाने इयत्ता दहावी बारावीच्या पुरवणी परीक्षेची चाचपणी सुरू केली आहे. ही परीक्षा ऑक्टोबर महिन्यात घेण्याची तयारी सुरू केली असून, याबाबतच्या सूचना सर्व विभागीय मंडळांकडून मागविण्यात आल्या आहेत. विभागांकडून आलेल्या सूचना तसेच कोरोनाची स्थिती विचारात घेऊन परीक्षेच्या तारखांबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल.

कोरोनाच्या वाढत्या प्रादुभावार्मुळे राज्य शासनाने पदवीच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. पण विद्यापीठ अनुदान आयोगाने परीक्षा घेण्याबाबत कठोर भूमिका घेतल्याने हा मुद्दा आता सर्वोच्च न्यायालयात गेला आहे. तसेच एमएचटी-सीईटीवरही अद्याप निर्णय झालेला नाही. सीईटी सेलच्या आयुक्तांकडून सर्वेक्षण सुरू असल्याचे उच्च तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केले आहे. शाळा सुरू करण्याबाबतही तळ्यात-मळ्यात असल्याने विद्यार्थी-पालकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. त्यातच राज्य शिक्षण मंडळाने दहावी बारावीच्या पुरवणी परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक तयार केले आहे.

लेखी, प्रात्यक्षिक तसेच तोंडी परीक्षा ऑक्टोबर महिन्यात घेण्याचे नियोजन आहे. हे वेळापत्रक सर्व विभागीय मंडळांना पाठविण्यात आले आहे. त्यावर सूचना दुरूस्त्या मागविण्यात आल्या आहेत. दरवर्षी जुलै महिन्यात या परीक्षा होतात. पण यंदा कोरोनामुळे निकाल विलंबाने लागल्याने पुरवणी परीक्षा होणार की नाही, याबाबतचा प्रश्न होता. पण राज्य मंडळाकडून संभाव्य वेळापत्रक तयार केल्याने आता या परीक्षेची चर्चा सुरू झाली आहे. दरवर्षी संभाव्य तारखा निश्चित करून विभागीय मंडळांकडून सूचना मागविल्या जातात. या वषीर्ही त्याच प्रक्रियेनुसार कामकाज सुरू आहे. पण यंदा कोरोनामुळे परिस्थिती वेगळी आहे.

राज्य शासन कोंडीत

पदवीच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याच्या भूमिकेवर राज्य शासन अद्यापही ठाम आहे. तर दुसरीकडे सीईटी तसेच पुरवणी परीक्षांची चाचपणी सुरू करण्यात आली आहे. या परीक्षा घ्यायचे झाल्यास पदवीच्या परीक्षा घेण्याचा निर्णय वादात सापडू शकतो. पुरवणी परीक्षा घेतल्यास एटीकेटी प्राप्त विद्यार्थ्यांपैकी अनेकांचे वर्ष वाया जाऊ शकते. तर सीईटी झाल्यास व्यावसायिक अभ्यासक्रमांना बारावीच्या गुणांवर प्रवेश द्यावा लागेल. पण अनेक विद्यार्थी बारावीच्या परीक्षेऐवजी सीईटीचाच कसून अभ्यास करतात. अशा विद्यार्थ्यांना प्रवेशाच्या स्पर्धेत फटका बसू शकतो.