MHT-CET 2020 सप्टेंबरनंतरच होणार?


CET Exam 2020

महाराष्ट्रातील सीईटी कधी होणार याकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागून आहेत्याबद्दल काय म्हणाले उच्च शिक्षणमंत्रीवाचा

MHT CET 2020:राज्यात व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षा (सीईटी) तालुकास्तरावर घेण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. तज्ज्ञ समितीचा अहवाल आला की, सीईटी घेण्याबाबत निर्णय जाहीर करण्यात येईल,’ अशी माहिती उच्च तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी शुक्रवारी दिली. शैक्षणिक कागदपत्रे उपलब्ध नसल्याच्या कारणावरून एकही विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहणार नाही, असे आश्वासन सामंत यांनी दिले. दरम्यान, सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात केंद्रीय पातळीवरील जेईई आणि नीट परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे या परीक्षा पार पडल्यानंतर राज्यातील प्रवेश परीक्षा पार पडण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे. यंदा एमएचटी सीईटीसाठी लाख ३२ हजार ३६१ विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत.

सर्वोच्च न्यायालयाने अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना परीक्षेशिवाय पदवी देता येणार नाही, असा निर्णय दिल्यानंतर राज्य सरकारने परीक्षा घेण्याच्या दृष्टीने सुरुवात केली आहे. त्यानुसार राज्यातील विद्यार्थी-पालकांमध्ये सीईटीबाबत उत्सुकता निर्माण झाली असून, सीईटी कधी होणार याकडे आता लक्ष लागले आहे. राज्यात इंजिनीअरिंग, फार्मसी, लॉ, हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी, बीएड अशा अनेक अभ्यासक्रमांच्या सीईटी परीक्षा होणे बाकी असून, त्यासाठी सात लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. त्यामुळे अनेक विद्यार्थी परीक्षेची वाट पाहत आहे.

याबाबत सामंत म्हणाले की, करोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता, जिल्हास्तरावर; तसेच तालुकास्तरावर सीईटी परीक्षा घेण्याबाबत उच्चशिक्षण संचालनालयाचे संचालक डॉ. धनराज माने आणि तंत्रशिक्षण संचालनालयाचे संचालक डॉ. अभय वाघ यांची समिती पडताळणी करीत आहे. त्यांनी तालुकास्तरावर सीईटी घेण्याबाबत चाचपणी सुरू केली आहे. येत्या दोन ते तीन दिवसांत, त्याचा अहवाल आल्यावर सीईटीबाबत घोषणा करता येईल, असेही सामंत यांनी स्पष्ट केले. अंतिम वर्षाच्या परीक्षा होत असतील, तर सीईटी परीक्षा घ्यायला काय हरकत आहे, अशी भूमिका काही पालकांनी मांडली आहे.

कागदपत्रांसाठी मुदतवाढ

डिप्लोमाच्या प्रवेश प्रक्रियेत विद्यार्थ्यांना अर्ज करताना, शैक्षणिक कागदपत्रे आणि दाखले जमा करण्यात अडचणी येत असतील, तर त्यांना मुदतवाढ मिळेल. शैक्षणिक कागदपत्रे नाहीत म्हणून राज्यात विविध अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी इच्छुक विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारण्यात येणार नाही, याची काळजी उच्च तंत्रशिक्षण विभागाकडून घेण्यात येईल, अशी माहिती सामंत यांनी दिली. दरम्यान, डिप्लोमा प्रवेश प्रक्रियेला; तसेच कागदपत्रे जमा करायला मुदतवाढ मिळण्याची शक्यता आहे.

CET Exam 2020  : करोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात सीईटी होऊ शकतात का, याबाबत सर्वेक्षण केले जात आहे. येत्या सात-आठ दिवसांत त्याबाबत माहिती दिली जाईल,’ अशी माहिती उच्च तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी गुरुवारी दिली. ‘राज्यात करोनामुळे परिस्थिती बिघडण्याची शक्यता असेल, तर बारावीच्या गुणांवर विद्यार्थ्यांना पदवी अभ्यासक्रमांना प्रवेशाचा विचार केला जाईल,’ असेही त्यांनी स्पष्ट केले.

टीचर्स ट्रेनिंग अॅकॅडमीच्या उभारणीचे काम पाहण्यासाठी सामंत गुरुवारी पुण्यात आले होते. या वेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधून विद्यार्थ्यांच्या अंतिम वर्षांच्या परीक्षा, सीईटी परीक्षा अशा विविध मुद्द्यांवर माहिती दिली.

 

सामंत म्हणाले, ‘करोनामुळे सीईटीसाठी जिल्हा स्तरावर मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांना आणू शकतो का, याचा विचारही करणे गरजेचे आहे. सुरक्षित अंतराचे सर्व नियम पळून तालुका स्तरावर आणि विभागीय स्तरावर सीईटी परीक्षांची परीक्षा केंद्रे करू शकतो का, याचाही विचार सुरू आहे. त्यासाठी आवश्यक सर्वेक्षण सीईटी सेलकडून करण्यात येत आहे. त्यासाठी तंत्रशिक्षण संचालनालयाचे संचालक डॉ. अभय वाघ आणि उच्चशिक्षण संचालनालयाचे संचालक डॉ. धनराज माने यांची समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीतर्फेही सर्वेक्षण करीत आहे.’ ‘सीईटीच्या आयुक्तांना परीक्षांबाबतच्या निर्णयाबाबत स्वायत्त अधिकार देण्यात आले आहेत. येत्या सात ते आठ दिवसांत सीईटीसंबंधी बैठक होऊन निर्णय घेतला जाईल,’ असेही सामंत यांनी सांगितले.

‘…तर बारावीच्या गुणांवर प्रवेश

सुरक्षित अंतराचे सर्व नियम पाळून सुमारे साडेपाच लाख विद्यार्थ्यांची सीईटी परीक्षा केंद्रांवर घेता येईल का, तालुका स्तरावर शिक्षणसंस्था परीक्षा घेण्यासाठी सक्षम आहेत का, ऑनलाइन परीक्षा घेण्यासाठी पायाभूत सुविधा कशी आहे, याची पडताळणी सुरू आहे. अनेक शाळा, कॉलेज, वसतिगृह क्वारंटाइन सेंटर झाली आहेत. त्यामुळे तेथे परीक्षा कशा घ्याच्या, हा प्रश्न आहे. सीईटी यंत्रणा स्वायत्त आहे, त्यांचे यासंबंधीचे सर्वेक्षण सुरू आहे. आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली, तर बारावीच्या गुणांवर प्रवेश देण्याचा विचार करण्यात येईल, असेही उदय सामंत यांनी सांगितले.

परीक्षा रद्दच्या भूमिकेवर ठाम

राज्यातील अकृषी विद्यापीठांतील अभ्यासक्रमांच्या अंतिम वर्ष पदवी परीक्षांबाबत राज्य सरकारने मांडलेली भूमिकाच सर्वोच्च न्यायालयात सादर केली आहे. करोनाच्या संसर्गामुळे उच्च तंत्रशिक्षण विभागाच्या परीक्षा महाराष्ट्रात होऊ शकत नाहीत, हेच आम्ही सर्वोच्च न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे. परीक्षा घेणार नाही, असे कोणत्याहीजीआरमध्ये म्हटलेले नाही. परिस्थिती सामान्य झाल्यावर विद्यार्थ्यांना परीक्षा देण्याचा पर्याय खुला आहे, असे सामंत यांनी स्पष्ट केले आहे. पदवी परीक्षा सप्टेंबरअखेरपर्यंत घ्याव्यात, असे निर्देश विद्यापीठ अनुदान आयोगाने देशातील सर्व विद्यापीठांना दिले आहेत. ‘यूजीसीच्या या निर्णयाच्या विरोधात युवा सेना, प्रा. धनंजय कुलकर्णी यांच्यासह विद्यार्थी संघटनांनी सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली आहे. त्यावरील सुनावणी आज, शुक्रवारी (१४ ऑगस्ट) होणार आहे.