एमपीएससी घेणार ऑनलाइन परीक्षा
एमपीएससीने ऑनलाइन परीक्षा घेण्याची तयारी केली आहे...ऑनलाइन-ऑफलाइनच्या खेळात विद्यार्थी मात्र द्विधा मनःस्थितीत आहेत.
एमपीएससी घेणार ऑनलाइन परीक्षा
राज्यात अराजपत्रित पदांच्या भरती प्रक्रिया महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) राबवाव्या की महाआयटी विभागाने, याबाबत राज्यात विद्यार्थ्यांचे दोन गट पडले असतांनाच, आता एमपीएससीने ऑनलाइन परीक्षा घेण्याची तयारी केली आहे. त्यासाठी एमपीएससीने महाआयटी विभागाप्रमाणे खासगी आयटी कंपनी नेमण्यासाठी निविदा प्रक्रिया राबविण्याला सुरुवात केली आहे. एमपीएससीकडून आतापर्यत ऑफलाइन परीक्षा घेण्यात येत असल्याने, विद्यार्थ्यांचा एमपीएससीला पाठिंबा होता. मात्र, आता एमपीएससीनेच ऑनलाइन परीक्षांची तयारी केल्याने, राज्यात स्पर्धा परीक्षांचे तयारी करणारे विद्यार्थी द्विधा मनःस्थितीत सापडले आहेत.
सध्याच्या परिस्थितीत एमपीएससीकडून घेतल्या जाणाऱ्या पदभरतीच्या परीक्षा लेखी (ऑफलाइन) पद्धतीने घेतल्या जातात. मात्र, तंत्रज्ञानामुळे होत असलेले बदल आत्मसात करून त्यानुसार कामकाजात बदल करण्याचा प्रयत्न एमपीएससीकडून करण्यात येत आहे. त्या दृष्टीनेच ऑनलाइन परीक्षांचे पाऊल टाकण्यात आले आहे. संगणकीय प्रणाली विकसित करण्यासाठी निविदा प्रक्रियेतून खासगी कंपनीची निवड केली जाणार आहे.ऑनलाइन पद्धतीने होणाऱ्या परीक्षांवर संपूर्णपणे आयोगाचेच नियंत्रण असेल. मोठ्या प्रमाणात उमेदवार असलेल्या परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेतल्या जाणार नाहीत. त्याचप्रमाणे ऑनलाइन परीक्षा सायबर कॅफेमध्ये न होता आयोगाकडून परीक्षेसाठीची संस्था निवडली जाईल. या ऑनलाइन परीक्षेवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे देखरेख करण्यात येणार आहे. त्यासाठीचा विशेष नियंत्रण कक्ष एमपीएससीच्या कार्यालयात असेल. आयोगाच्या प्रतिनिधीच्या उपस्थितीतच ऑनलाइन परीक्षा घेतली जाणार आहे, असे निविदा प्रक्रियेतून स्पष्ट होते. दरम्यान, या संपूर्ण प्रकारात करोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थिती पदभरतीची प्रक्रिया होणार आहे की नाही, याबाबत कोणीच बोलायला तयार नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना वेट अँड वॉचच्या भूमिकेत राहावे लागणार असल्याचे चित्र आहे.
चाचणीनंतर ऑनलाइन होणार परीक्षा
एमपीएससीकडून घेतल्या जाणाऱ्या परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेण्यासाठी एमपीएससी प्रशासनाकडून चाचपणी करण्यात येत आहे. निविदा प्रक्रियेतून ऑनलाइन परीक्षेसाठी संगणकीय प्रणाली विकसित झाल्यानंतर, छोट्या स्वरुपाच्या परीक्षांचे ऑनलाइन माध्यमातून आयोजन करण्यात येईल. ही चाचणी यशस्वी झाल्यावर, मोठ्या संख्येने परीक्षार्थी असणाऱ्या परीक्षेसाठी ऑनलाइन परीक्षा पद्धतीचा वापर करण्यात येईल.