मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजना
राज्यातील शेतकऱ्यांचा पाण्याचा प्रश्न सुटावा यासाठी राज्य सरकारने बळीराजासाठी एक कल्याणकारी योजना आणली आहे. शेतात घामाच्या धारा गाळून शेतकरी शेती फुलवत असतात. परंतु गावांमध्ये वेळेवर वीज उपलब्ध नसल्यामुळे पीकांना गरजेवेळी पाणी देता येत नाही, यामुळे बळीराजाचे मोठे आर्थिक नुकसान होत असते. सोन्यासारखी पीके पाण्याअभावी जळून जात असतात. शेतकऱ्यांची ही अडचण सोडविण्यासाठी राज्य सरकारने ही योजना आणली आहे, या योजनेचे नाव आहे मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांचा पाण्याचा प्रश्न सुटेल आणि शेतात व्यवस्थित सिंचन करता येईल. पिकांना पाणी योग्यवेळी मिळाल्यामुळे शेतातून शेतकरी भरघोष उत्पन्नही घेऊ शकतील. आज याच योजनेविषयी आपण जाणून घेणार आहोत...
आपल्या शेतात आपण विजेवरील पंप आणि विज गेल्यानंतर पर्यायी सोय म्हणून डिझेल पंप बसवत असतो. परंतु या पंपामुळे डिझेल मोठ्या प्रमाणात लागत असते. यामुळे आपला खर्च अधिक होत असतो. सरकारच्या मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेतून शेतकऱ्यांना डिझेल पंपच्या ऐवजी सोलर पंप देणार आहे. आता आपल्या सर्वाच्या मनात प्रश्न पैशाचा प्रश्न आला असेल. परंतु सरकार या पंपसाठी आपल्याला अनुदानही देते. त्यामुळे पैशाची चिंता करणं व्यर्थ आहे. या योजनेतून राज्य सरकार शेतकऱ्यांना १ लाख कृषी पंप देणार आहे. या योजनेला अटल सौर कृषी पंप योजना या नावानेही ओळखले जाते.
आपल्या शेतात कृषी पंप बसवून आपले उत्पन्न दुप्पट करायची इच्छा असेल. तर ते शेतकरी या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करु शकतात. सरकारने दिलेल्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन आपण अर्ज करु शकतात. खाली दिलेल्या संकेतस्थळावर जाऊन आपण याविषयी अधिक माहिती घेऊ शकता आणि अर्ज करु शकता.
https://www.mahadiscom.in/solar
सौरकृषीपंपाचे फायदे
- दिवसा शेतीपंपास वीजेची उपलब्धता
- दिवसा विनाव्यतय अखंडित वीज पुरवठा
- वीज बिलापासून मुक्तता
- डिझेल पंपाच्या तुलनेत शून्य परिचलन खर्च
- पर्यावरण पुरक परिचलन
- शेती सिंचनाचा भाग वीज सबसिडीपासून पृथ्थकरण करणे
- औद्योगिक, वाणिज्यिक व घरगुती वीज ग्राहकांवरील क्रास सब्सिडीचा बोज कमी करणे
पारेषण विरहीत सौर कृषीपंप नविन वीज जोडणी करिता अर्जाची प्रक्रिया.
महावितरणाच्या वेब पोर्टलवर (https://www.mahadiscom.in/solar) ऑनलाइन अर्ज करावा.
सध्याच्या कृषीपंपाकरिता नवीन वीज जोडणीसाठी पैशाचा भरणा करुन प्रलंबित असलेल्या अर्जदाराने फक्त काही अनिवार्य फील्ड, उदा. अर्ज क्रमांक, पैसे भरल्याची पावती क्रमांक, मंजुरी क्रमांक आणि क्षमतेची मागणी इ. तपशील देणे अनिवार्य आहे. नवीन अर्जदार (परंपरागत कृषीपंप नवीन वीज जोडणीसाठी पैशाचा भरणा केलेला नाही) सर्व फील्ड अनिवार्य आहेत म्हणून तपशील भरणे आवश्यक आहे. ए - 1 फॉर्मवर संपूर्ण माहिती भरावी त्यासोबत (कागदपत्रांची प्रत अपलोड करावी)
कागदपत्रे
- ७/१२ उतारा प्रत
- आधार कार्ड
- कास्ट प्रमाणपत्र (एससी / एसटी लाभार्थींसाठी)
अर्जदाराने ए - 1 फॉर्मवर व घोषणापत्रावर सही करणे आवश्यक आहे. ऑनलाइन ए - 1 फॉर्म प्राप्त झाल्यापासून १० दिवसांच्या आत, सर्वेक्षण केल्यानंतर फील्ड ऑफिसमधून डिमांड नोट जारी केले जाईल. जर काही विसंगती आढळली तर त्यानुसार अर्जदाराला कळविण्यात येईल. डिमांड नोट देय झाल्यानंतर लाभार्थी एजन्सीचे नाव सादर करेल / देईल (केवळ २५ हजार निविदासाठी लागू आहे). प्रत्येक टप्प्यावर अर्जदारांना एसएमएसद्वारे कळविण्यात येईल.