पदवी परीक्षा ऑनलाइनच; सर्व विद्यापीठांचे एकमत

Final Year Exams 2020

 


Final Year Exams 2020 : जे विद्यार्थी ऑनलाइन परीक्षा देऊ शकत नाहीत, त्यांच्यासाठी कॉलेजमध्येच परीक्षा होतील.

राज्यातील सर्व १३ अकृषी विद्यापीठांच्या परीक्षा ऑनलाइनच होणार असून, त्या बहुपर्यायी प्रश्नांच्या आधारे घेतल्या जातील यावर आता शिक्कामोर्तब झाले आहे. सर्व विद्यापीठांनी आपण परीक्षा कशी घेणार याचा अहवाल राज्य उच्च शिक्षण संचालकांकडे सादर केला आहे. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने इंजिनीअरिंग आणि तांत्रिक परीक्षा वगळता इतर पारंपरिक अभ्यासक्रमांच्या परीक्षा या लेखी स्वरूपात घेणार असल्याचे ठरविले आहे.

करोनाच्या काळात अंतिम वर्ष परीक्षांचे नियोजन करताना, विद्यार्थ्यांना घरी बसूनच परीक्षा देता यावी, याबाबत राज्य सरकार तसेच राज्यपाल आग्रही होते. यानुसार सर्व विद्यापीठांनी नेमकी काय तयारी केली आहे याचा अहवाल सादर करण्याबाबतच्या सूचना उच्च तंत्र शिक्षण संचालकांनी विद्यापीठांना केल्या होत्या. यासाठी सोमवारपर्यंतची मुदत देण्यात आली होती. यानुसार राज्यातील बहुतांश विद्यापीठांचे अहवाल संचालकांकडे जमा झाले. यात अंतिम वर्षाची परीक्षा ही तीन तासांऐवजी एक तासांची होईल. तसेच १०० गुणांऐवजी ५० गुणांची बहुपर्यायी प्रश्नांच्या आधारे परीक्षा घेण्यात येईल. ही परीक्षा कॉलजस्तरावर होणार असून ऑनलाइन पद्धतीने होणार असल्याचेही विद्यापीठांनी स्पष्ट केले. जे विद्यार्थी ऑनलाइन परीक्षा देऊ शकत नाहीत, त्यांच्यासाठी कॉलेजमध्येच परीक्षा होतील. सर्व विद्यापीठांनी शासनाने दिलेल्या ३१ ऑक्टोबरपर्यंतच्या मुदतीत परीक्षा पूर्ण करण्याचे प्राथमिक नियोजन केले आहे. गेल्या सहा महिन्यांपासून विद्यार्थी अभ्यासापासून दूर आहेत. तसेच या विद्यार्थ्यांना बहुपर्यायी प्रश्न सोडविण्याची सवय नाही. यामुळे विद्यापीठांनी प्रश्नसंच उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी करणार असल्याचे युवा सेनेचे सरचिटणीस वरुण सरदेसाई यांनी ट्वीटद्वारे सांगितले.

ऑफलाइन परीक्षेचाही पर्याय

ज्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन परीक्षा शक्य नाही, त्यांच्यासाठी ऑफलाइन परीक्षांचे पर्यायही देण्यात येणार आहेत. मात्र संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने इंजिनीअरिंग तांत्रिक शाखा वगळता इतर पारंपरिक अभ्यासक्रमांच्या परीक्षा विद्यार्थी ज्या कॉलेजमध्ये शिकले, त्या कॉलेजमध्येच घेण्याचे ठरविले आहे. यासाठी प्रश्नपत्रिका देण्यात येणार असून, त्यापैकी कोणतेही तीन प्रश्न विद्यार्थ्यांना दीड तासात सोडवायचे आहे. असा निर्णय घेणारे हे एकमेव विद्यापीठ ठरले आहे.

विद्यापीठनिहाय विद्यार्थ्यांची संख्या

  • मुंबई,०३,७००
  • सावित्रीबाई फुले पुणे,५५,१२४
  • संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ७०,२३४
  • गोंडवाना विद्यापीठ२४,०००
  • राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ७०,०००
  • शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर७३,५०६
  • पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ३८,०००
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ ७३,६२१
  • स्वामी रामानंदतीर्थ मराठवाडा विद्यापीठ३५,५००
  • कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ४६,४६६
  • एसएनडीटी महिला विद्यापीठ१४,८३९