Engineering Admission 2020 1 सप्टेंबरपासून; सुधारित वेळापत्रक जाहीर


Engineering Admission 2020

Engineering Admission 2020 : एआयसीटीईने इंजिनीअरिंग तसेच विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशाचे सुधारित वेळापत्रक जाहीर केले आहे.

Engineering Admission 2020 : अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेने (एआयसीटीई) इंजिनीअरिंग तसेच विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशाचे सुधारित वेळापत्रक जाहीर केले आहे. यानुसार सध्या शिकत असलेल्या विद्यार्थ्यांचे वर्ग सप्टेंबरपासून, तर नव्याने प्रवेशित होणाऱ्या विद्यार्थ्यांचे वर्ग नोव्हेंबरपासून सुरू होणार आहेत. तसेच या वेळापत्रकानुसार राज्यांना पहिली गुणवत्ता यादी २० ऑक्टोबरपूर्वी जाहीर करावी लागणार आहे.

करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे शाळा, कॉलेजे बंद आहेत. यामुळे यंदाचे शैक्षणिक वर्ष सुरू होण्यास उशीर होत आहे. इंजिनीअरिंग प्रवेशासाठी राष्ट्रीय पातळीवर आवश्यक जेईई सप्टेंबरमध्ये होणार आहे, तर राज्यांनाही आता त्यांच्या प्रवेश परीक्षा सप्टेंबर महिन्यातच पूर्ण करणे आवश्यक राहणार आहे. कारण परिषदेने दिलेल्या सुधारित वेळापत्रकानुसार २० ऑक्टोबरपूर्वी पहिली गुणवत्ता यादी जाहीर होणे अपेक्षित आहे. त्यानंतर दुसरी गुणवत्ता यादी नोव्हेंबरपर्यंत जाहीर करावी लागणार आहे. तर इंजिनीअरिंगचे वर्ग हे नोव्हेंबरपासून सुरू करावेत असेही परिषदेने सूचित केले आहे. यामुळे राज्य सरकारना नोव्हेंबरपर्यंत व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमांचे प्रवेश पूर्ण करावे लागणार आहे.

आता राज्य सरकार इंजिनीअरिंग प्रवेश परीक्षेबाबत काय निर्णय घेते यावर पुढील प्रक्रिया अवलंबून असणार आहे. सरकारला प्रवेश परीक्षेबाबत तातडीने निर्णय घेणे अपेक्षित आहे. आता तरी सरकारने लवकरात लवकर प्रवेश परीक्षेबाबत निर्णय घ्यावा अशी मागणी होऊ लागली आहे.

मुक्त शिक्षण दोन सत्रांत

विद्यापीठ अनुदान आयोगाने मुक्त शिक्षण दोन सत्रात घेण्याबाबत सूचना केल्या आहेत. करोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता बहुतांश विद्यार्थी मुक्त शिक्षणाकडे वळतील अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. याबाबत विद्यापीठ अनुदान आयोगाने मुक्त शिक्षणात प्रवेश घेताना या शिक्षणाचा कालावधी हा १२ महिन्यांचा असणे आवश्यक आहे असे स्पष्ट करत यंदा सप्टेंबर-ऑक्टोबर फेब्रुवारी-मार्च अशा दोन सत्रांत विद्यार्थ्यांना प्रेवश द्यावेत असे सूचित केले आहे. यानुसार तंत्र शिक्षण परिषदेनेही व्यावसायिक अभ्यासक्रमांचे मुक्त शिक्षण सत्र दोन सत्रांत घेण्याचे ठरविले आहे. यानुसार पहिल्या सत्रांतील प्रवेश ३० ऑगस्टपूर्वी, तर दुसऱ्या सत्रातील प्रवेश २८ फेब्रुवारी २०२१ पूर्वी होणे बंधनकारक असणार आहे.

नवीन वेळापत्रक

  • सध्या शिकत असलेल्या विद्यार्थ्यांचे नव्या शैक्षणिक वर्ष : सप्टेंबर
  • पहिली प्रवेश फेरी : २० ऑक्टोबरपूर्वी
  • दुसरी प्रवेश फेरी : नोव्हेंबरपूर्वी
  • नव्याने प्रवेशित विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात : नोव्हेंबर
  • प्रवेश रद्द करण्याची मुभा : १० नोव्हेंबर
रिक्त जागांवर प्रवेश : १५ नोव्हेंबरपर्यंत